कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मूर्ती संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे पुरातत्व खात्याच्या तज्ञांनी मूर्तीची तपासणी केली असून सद्य परिस्थितीत मूर्तीची स्थिती काय आहे आणि त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत एक अहवाल सादर केला आहे हा अहवाल आज पोस्टाने न्यायालयात पाठवण्यात आला आहे.
श्री अंबाबाईच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज होते आहे. ही झीज रोखण्यासाठी रासायनिक संवर्धन कमी पडते आहे. या पार्श्वभूमीवर श्री पूजक गजानन मुनेश्वर यांनी मूर्तीची पाहणी करून एक अहवाल देण्यासाठी तज्ञांची नियुक्ती केली जावी अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती.
यावर सुनावणी पार पडली असून पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 14 आणि 15 मार्च रोजी मूर्तीची पाहणी पूर्ण केली आहे. हा अहवाल आता त्यांनी सोमवारी पोस्टाने न्यायालयास पाठवला आहे. यावर आता दिवाणी न्यायालय आज सुनावणी करणार असल्याची माहिती मिळते आहे.