पुणे : वसंत मोरे हे तब्बल 18 वर्ष मनसेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात आहेत. काही दिवसांपासून त्यांचं मन मनसेमध्ये लागत नाही असे स्पष्ट दिसूनच येत होते. फेसबुक पोस्ट Facebook post वरून ते आपल्या मनातील मळमळ अनेक वेळा व्यक्त करत होते. राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील नेत्यांबरोबर होणाऱ्या अंतर्गत कुरबुरींमुळे ते राजीनामा देत आहेत असं म्हणाले आहेत. दरम्यान अनेक महिन्यांच्या अंतर्गत वाद विवादानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी अमित ठाकरेंचा तो एक फोन कारण ठरला असल्याचं बोलले जाते.
नेमकं काय घडलं होतं ?
फेब्रुवारी महिन्यामध्ये अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी विद्यापीठातील एका महत्त्वाच्या विषयावर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन यशस्वी देखील झालं होतं. या आंदोलनादरम्यानच अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन केला होता. या फोनवरील पूर्ण संभाषण हे समजलं नसलं तरी वसंत मोरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार अमित ठाकरे त्यांना म्हणाले की, ” आजचा मोर्चा खूप छान झाला. मला समजलं तुम्ही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता ? पण मला तुम्ही दिसले कसे नाही .. भेटलात कसे नाही ?
https://www.facebook.com/emahatalks/videos/694135489321163
यावर वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट करून अमित ठाकरे यांना एक उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी या मोर्चात त्यांचा सहभाग असल्याचा एक फोटो शेअर केला. आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ” साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो. त्याचा हा पुरावा, साहेब मी काम करणारा आहे. नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावलं चालत होतो. असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल. अमित साहेब तुमच्यासाठी काही पण, फक्त मला समजून घ्या ! ” अशी फेसबुक पोस्ट त्यावेळी त्यांनी केली होती.
खरंतर वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या कार्याबद्दल आणि आपल्या मनातील भावनांबद्दल स्पष्टपणे बोलत असतात. यावरूनच अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना खडे बोल सुनावले असल्याचं समजतंय. या पोस्टवरून अमित ठाकरे वसंत मोरेना म्हणाले होते की, सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, आणि हा सल्लाच राजीनामा द्यायचा निर्णय आला शेवटचा घाव घालणारा ठरला असल्याचं म्हटलं जात आहे.