पुणे : स्त्रियांना मनुष्य म्हणून धोरण प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी आणलेले महिला विधेयक स्वागतार्ह असुन त्याबाबत समाजात प्रचार व प्रसार गरजेचा आहे असे ऊपसभापती विधानपरिषद तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत आणि त्याबाबत खुली चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन आज बुधवार रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती, फर्ग्युसन रस्ता, पुणे येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या.
याप्रसंगी माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील, चंद्रकांता सोनकांबळे, निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, समाजातील सर्वच घटकांतील स्त्रियांना आरक्षण मिळाल पाहिजे. महिला विधेयक मंजूर केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे स्वागत डॉ. गोऱ्हे यांनी केले. आरक्षणाचा लाभ हा अनुसूचित जाती जमातीमधील स्त्रियांना देखील लागू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. १९३५ साली सरोजिनी नायडू यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणामुळे आगामी काळात राजकारणात नवीन महिला दिसतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिलांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर त्यांची संख्या देखील वाढू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आरक्षणाच्या निमित्ताने राजकारणात जनमताची दखल घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महापौर श्रीमती. दीप्ती चवधरी म्हणाल्या, सरकारने महत्वाचे पाऊल टाकलेले आहे. इतर मागासवर्गीय जातीच्या आरक्षणामुळे त्यांना स्वतःला महापौर पदावर काम करता आल्याचे त्यांनी सांगितले. महिलेला प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महिला आरक्षणाबाबत स्त्रियांमध्ये जागृती केली पाहिजे असे श्रीमती. दीप्ती चवधरी यांनी सांगितले.
माजी नगरसेविका श्रीमती. माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, महिला आरक्षण मिळाले असले तरी त्यासाठी अभ्यास व परिश्रम यातुन महिलांनी गुणवत्ता वाढवली पाहिजे. आरक्षणाच्या निर्णयामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्त्रियांनी धाडस केले पाहिजे. केंद्रात स्थिर सरकार असल्याने महिला शक्ती वंदन विधेयक आणणे सरकारला शक्य झाले असेही माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या.
माजी नगरसेविका श्रीमती. रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात सहभागी होणे आवश्यक आहे. आरक्षणाबाबत श्रेय वादाचा विषय येत नाही महिलांना आरक्षण मिळाले हे महत्वाचे आहे. स्त्रियांची ताकद दाखवण्यासाठी स्त्रियांनी एकत्र येण्याची गरज आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे.
माजी नगरसेविका श्रीमती. चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे नगरसेवक पदावर काम करता आले माझ्याप्रमाणेच इतरही अनुसूचित जातीमधील महिलांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संसदेत महिला विधेयक मंजूर झाल्यबद्दल आनंद होत असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. आरक्षणामुळे स्त्रियांना त्यांच्या हक्काचे मतदारसंघ मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
निवृत्त माहिती संचालक श्रीमती. श्रद्धा बेलसरे म्हणाल्या, महिलांना अन्याय सहन करण्याची सवय लागलेली आहे. त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी मिळालेल्या आरक्षणाच्या संधीचा योग्य फायदा करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती. जेहलम जोशी म्हणाल्या, अनेक हुशार व्यक्ती राजकारणापासून दूर गेलेल्या आहेत. या आरक्षणामुळे स्त्रियांचा कल राजकारणाकडे वाढेल. राजकारणाची गुणवत्ता सुधारायची असेल तर महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती यांसह इतर भागातून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा जोगळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता शिंदे यांनी केले.