नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला Winter Session of Parliament आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला, तर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी मोदी-मोदींच्या घोषणा दिल्या. मात्र, या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकालही रविवारी जाहीर झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने तीन राज्यांवर वर्चस्व मिळवले आहे. तर तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली. दरम्यान, सोमवारी सकाळी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला टीएमसी, आपसह अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.
हे अधिवेशन २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात १९ दिवस चालणाऱ्या १५ बैठका होणार आहेत. २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात २१ महत्त्वाची विधेयके मांडली जाऊ शकतात. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. हे अधिवेशन अत्यंत गोंधळाचे ठरण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील नैतिकता समिती आपला अहवाल सादर करणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे.
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. विकासापुढे नकारात्मकता नेहमीच अपयशी ठरते, हे जनतेने दाखवून दिले आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, जे लोक देशाच्या हिताचा विचार करतात, जनता नेहमीच त्यांच्यासोबत असते.