अमरावती : अमरावतीतून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याबाबत मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. या सर्व विरोधाला न जुमानता महायुतीच्या वतीने भाजपाने नवनीत राणा यांनाच उमेदवारी घोषित केली. परंतु त्यांच्या जात प्रमाणपत्र वैद्यतेवरून सर्वोच्च न्यायालयात सुनवाई होणे बाकी होते. दरम्यान आज स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जातप्रमाणपत्र वैध असल्याची माहिती दिली.
नवनीत राणा या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत. महायुतीच्या वतीने भाजपने त्यांना उमेदवारी घोषित केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांच्या जात प्रमाणपत्र वैध असल्याची सुनावणी केली. त्यामुळे आता न्यायालयीन लढाई संपवून त्या राजकीय लढाई लढवण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.आज अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठी जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेला स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नवनीत राणा यांना भावना अनावर झाल्या. त्या म्हणाल्या की, ” गेल्या अनेक वर्षापासून नवनीत राणा जेलमध्ये जातील अशा वल्गना विरोधक करत होते. माझी छोटी छोटी मुलं ही मला विचारायची, ‘आई तू नेमकं काय केलंय ज्याच्यामुळे तुला तुरुंगात जावं लागेल ?’ पण सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला. यावेळी मुलांच्या आठवणीने त्यांच्या भावना अनावर झाल्या मंचावरच त्यांना अश्रू अनावर झाले.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहारचे बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला होता. तसेच त्यांनी त्यांच्या विरोधात आपला उमेदवार घोषित करून भाजपच्या विरुद्ध बंड देखील पुकारले आहे. एकंदरीतच आता भाजपसाठी अमरावतीची ही लढाई प्रतिष्ठेची होणार आहे.