सातारा : सातारा Satara लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी देण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आपला हट्ट सोडला असून उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महायुतीच्या प्रमुख घटक पक्षातील जागा वाटपाचा तिढा अद्याप देखील पूर्णपणे सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्याचा हट्ट सोडला आहे. पण त्या बदल्यात नाशिक दिले जावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाच्या तिढ्याची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
उदयनराजे यांना पहिल्या २ उमेदवारांच्या यादीत उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे एकीकडे समर्थक साताऱ्यात आक्रमक झाले होते. तसेच काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे केंद्रीय गृहमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून देखील उदयनराजेंना अमित शहा यांची भेट मिळू शकली नव्हती. त्यामुळे साताऱ्यातील वातावरण तापत चालले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसाठी साताऱ्याची जागा सोडल्याचे समजत असून उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. साताऱ्यात उदयनराजेंचा सत्कार सोहळा होणार असल्याचे मोठे पोस्टर्स देखील झळकत आहेत.