मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आव्हाड यांनी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून “ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही…! ” अशी टीका केली आहे.
अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये मोठं जनआंदोलन उभं केलं. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन उभारून लोकपाल कायदा करण्याची मागणी केली होती. देशभरात तात्कालीन सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध वातावरण तयार झालं. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या कामाची प्रशंसा करत भाजपने देशात मोदींच्या नेतृत्वात 2014 साली निवडणुका लढवल्या आणि बहुमताचा आकडा गाठून मोदी सरकारची स्थापना झाली होती.
https://x.com/Awhadspeaks/status/1709773097392574697?s=20
सोशल मीडियावर अण्णा हजारे यांना युजर्स अनेक वेळा ट्रोल करत असतात. अण्णा हजारेंनी भाजप सरकार आल्यानंतर कोणतेही आंदोलन केले नाही. देशात महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचार असे अनेक मोठे प्रश्न असताना देखील अण्णा हजारे गप्प का ? असा सवाल सातत्याने होत असताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करून त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.