उत्तर प्रदेश : आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान देशभरात सुरू आहे. देशातील तब्बल 49 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान उत्तर प्रदेश मधील एटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मतदाराने तब्बल आठ वेळा मतदान करून स्वतःच एक व्हिडिओ VIDEO पोस्ट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील एटामध्ये राहणाऱ्या एका मतदारांन तब्बल आठ वेळा मतदान केलं आणि स्वतःच आठ वेळा मतदान केल्याचा पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला. हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रावरील सर्व सदस्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केल आहे. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ही पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात एटा जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 171 आणि 419 आरपी कायदा 951 च्या कलम 128, 132 आणि 136 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी दिली. या मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक देखील केली आहे.