मुंबई : संजय राऊत यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. यावेळी त्यांनी भाजप सोबतच विधानसभा अध्यक्ष यांच्यावर देखील कटू शब्दात टीका केली आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव आणत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी घटनेनुसार शपथ घेतली. त्या आधी वकील म्हणून सनद घेतली आहे. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या एक वर्षापासून घटनेचा कायद्याचा महाराष्ट्रात खून होताना दिसतो आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांना काय वाटत नसेल तर विधिमंडळाच्या इतिहासात काळ्याकुट्ट पानावर त्यांचे नाव लिहिले जाईल. जनतेच्या न्यायालयात याबद्दल रोष आहे. त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल”. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट टीका केली आहे.
तसेच भाजपवर देखील त्यांनी हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, ” 2024 पूर्वीच भाजप पक्ष ही फुटेल, तसेच भाजपच्या नेतृत्वात सध्याचे एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाली, पाटणा बंगळूरूत बैठक झाली. तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती मग त्यांनी इकडून तिकडं लोक गोळा करून दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. शिवसेना अकाली दल नसेल तर एनडीएची ताकद शून्य आहे. आम्हीच नाही बाकी लोक येतात आणि जातात एनडीए अस्तित्वात नाही.
तसेच सनातन धर्माला कोणी मुळासकट उखडून टाकू शकत नाही. भाजपने सनातन धर्माच्या संरक्षणासाठी ठेका घेतलेला नाही. इथे शिवसेना बसलेली आहे. आम्ही काम करू धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला कोणी अडवू शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा नाही सनातन धर्माची तुम्हाला अचानक चिंता लागली आहे. तसेच 2024 साठी भाजपा आणि मोदींकडे मुद्दा नसून महागाई, बेरोजगारी, चीन घुसखोरी हे मुद्दे आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, कॅनडा हे देखील मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु सनातन धर्माचा मुद्दा उचलला जातोय. असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी भाजप लगावला आहे.