पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुण्यातील सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” आपल्याकडे म्हटलं जातं काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी येथील एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हा अतृप्त आत्मा 1995 मध्ये शिवसेना-भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहत होता. 2019 साली अतृप्त आत्म्याने काय केलंय हे राज्याने पहिले आहे. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या आत्म्याने सुरु आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.
Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबईतून एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर प्रभाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. यावेळी मोदींवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका करताना म्हटले आहे की, हा नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय आहे. पण भाजपाचा अंतिम संस्कार महाराष्ट्रातच होईल. या भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्राने अंधश्रद्धा फेकाफेकी यांना कधीही महत्त्व दिलं नाही. महाराष्ट्र पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. काल मोदी पुण्यात होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी त्यांनी केला का? आंबेडकरांवरती भाजपला राग आहे. संविधान त्यांना बदलायचे आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आंबेडकरांचे संविधान त्यांना बदलायचे आहे. असे सडेतोड उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.