मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येणार आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.
बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा.
स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.
संजय राऊत यांनी वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. स्वत:ला हिंदुत्व म्हणवणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे. आधी दोन आणि आता तीन, पाच नेत्यांना एका महिन्यात भारतरत्न देण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, एका वर्षात जास्तीत जास्त तीन जणांना भारतरत्न देता येईल, असा नियम आहे. एका महिन्यात पाच जणांना भारतरत्न देण्याची मोदींची घोषणा निवडणुकीची रणधुमाळी आणखी काय आहे? ते म्हणाले, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात आला. आणखी काही नेते वाट पाहत आहेत, पण बाळासाहेब ठाकरेंना का विसरायचे? ज्याने संपूर्ण भारताला हिंदू बनवले… ज्यामुळे मोदी अयोध्येत राम मंदिर साजरा करू शकतात…
यंदा पाच व्यक्तींना भारतरत्न जाहीर
कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन या पाच व्यक्तींना केंद्र सरकारने २०२४ साठी भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. मात्र, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्यांची संख्या आतापर्यंत ५३ झाली आहे.