मुंबई : राज ठाकरे यांच्या घरी आज मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या मुद्द्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुरुवारी 12 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीनंतर, आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर बैठकीचं नियोजन करण्यात आल होतं. “टोलनाक्यांवर पारदर्शकता यावी यासाठी सरकारचे कॅमेरे लावले जातीलच, पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल. इतकंच नाही तर टोलनाक्यांवर 4 मिनिटांपेक्षा जास्त एकही गाडी थांबणार नाही”, असा निर्णय झाल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सकाळी 8 वाजता राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले. यानंतर राज ठाकरेंसोबत टोलबाबत चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे म्हणाले कि, “टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयी सुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील. आणि किती गाड्या या टोलवरून जातात हे कळेल. ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल. अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल.
तसेच करारमधील नमूद उड्डाणपूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. आयआयटी मुंबईकडून हे ऑडिट करण्यात येईल. 5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर वाढीव टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.
आनंद नगर टोलनाक्यावरून ऐरोली टोल नाक्यावर जायचे असेल तर एकच टोल भरावा लागेल. याचा निर्णय 1 महिन्यात घेतला जाईल. हरी ओम नगर मुलुंडमधील रहिवाशांना ब्रिज बांधून देण्यात येईल त्यांना टोल भरण्याची गरज नसेल. राष्ट्रीय महामार्गावर जर रस्ते खराब असतील तर त्या ठिकाणचा टोल रद्द करण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी 15 दिवसात बोलेल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि एमएसअरडीसीचे 14 असे टोलबाबत महिन्यात निर्णय घेतला जाईल हे टोल बंद करावे अशी आमचे मागणी आहे.
अवजड वाहनांना शिस्त लावण्यासाठी एक लेन असावी यासाठी दादा भुसे विचार करतील. प्रत्येकाला वाटंत की आम्हला रस्ते चांगले मिळावे ,मी नितीन गडकरी यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. रस्ते सुधारण्याची जबाबदारी ही टोलवाल्यांची आहे. राज्य सरकार अखत्यारीत असलेल्या टोलबाबत निर्णय राज्य सरकार करेल. अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
दादा भुसे म्हणले कि , मुंबई एन्ट्री पॉईंट्स टोल आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर समिती वेगळी नेमण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी जे मुद्दे ठेवले त्यावर आम्ही आजच कामाला लागलो. एन्ट्री पॉईंट्स आणि राज्यातील टोल बाबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही काय सुविधा दिल्या त्याची माहिती दिली. टप्याटप्याने आम्हाला अंमलबजावणी करायची आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ज्या टोल नाक्यावर वसुलीसाठी जे कर्मचारी बसवले जातात, त्यांचं बॅकग्राऊंड तपासणे गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. त्यावर आपण तसे आदेश दिल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
टोल नाक्यावर स्वच्छतागृह उभारली पाहिजेत. आम्ही सुद्धा कंटेंनर एन्ट्री पॉईंट्सला ठेवतो. बातम्यांसाठी मी विषय घेत नाही. आज मंत्री घरी आले कारण मी भुसेंना आता ओळखत नाही ते काम करतात. 1 महिन्यात काम करतील अशी अपेक्षा ठेवूया. ते माझ्या घरी आले म्हणताय कारण शासन आपल्या दारी असलेले हे सरकार आहे, असं टोमणा राज ठाकरे यांनी लगावला.