पुणे : पुण्यातील विविध प्रश्नांवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे कडाडले आहेत. पुण्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले आहेत. यावरून अमित ठाकरे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आणि युवकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुणे विद्यापीठामध्ये मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळणे, नाष्ट्यामध्ये झुरळ-अळ्या निघणे, तसेच वॉशरूम आणि हॉस्टेलमधील असुविधे बाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावर प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे, पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगरमधील उपकेंद्र यांच्या नवीन इमारतींचा उद्घाटन कार्यक्रम अद्याप का होत नाही ? असे सवाल उपस्थित केले. तसेच येत्या आठ दिवसांमध्ये कारवाई केली गेली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
पुण्यातील टोळी युद्ध विद्यापीठांमधील कारभार आणि ड्रग्स प्रकरणी अमित ठाकरे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.