पुणे : मंगळवारी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी Medha Kulkarni यांनी पुणे महानगरपालिकेकडे Pune Municipal Corporation सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. यानंतर राज्यसभेसाठी भाजपकडून मेधा कुलकर्णींना संधी मिळणार या चर्चेला उधाण आले होते. आणि आज त्यांच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तब केला आहे.
येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या रिक्त पदांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी ही निवडणूक होते आहे. पुण्यातून राज्यसभेसाठी कोणाला संधी मिळणार याविषयी चर्चेला उधाण आले असतानाच आज भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
लोकसभेसाठी या नावांची जोरदार चर्चा
राज्यसभेवर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आता लोकसभेसाठी माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या तिघांचीही जोरदार तयारी देखील सुरू आहे.