बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोवर आणि इतर सहा ठिकाणी काल कारवाई केली आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई झाली तेव्हा रोहित पवार हे परदेशात होते. परत आल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले की, ” गेल्या सात दिवसात दिल्लीला कोण गेलं होतं याची माहिती घ्या. त्यामध्ये भाजपचे आणि अजित पवारांचे कोण सोबती गेले होते याची माहिती घ्या. त्यानंतर सर्व घटनाक्रम लक्षात येईल. आपण काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलोच नसतो. अजित दादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो…! ” असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे.
आमच्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. महाराष्ट्र धर्म आणि विचार महत्त्वाचा आहे. यात काही नेते आमच्या कंपनीत घोटाळा झाल्याचं मोठ्या आवाजात सांगत आहेत. यात काही मनी लाँड्रिंगचा काही विषय नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांवरही आपला काही आक्षेप नाही. आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य असेल. या आधी ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली त्यांची यादी एकदा पब्लिश करा. आता ते नेते त्याच पक्षात आहेत की भाजपमध्ये गेलेत याचीही माहिती घ्या. असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे.