Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटात कार्यकारिणीचा विस्तार झाल्यानंतर काही नेते, पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा जोर धरते आहे. नाराज असलेले नेते, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटानं आपल्या कार्यकारणीचा मोठा विस्तार केला. एकूण सहा आमदार, खासदारांना नेते पद दिलं. तर उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही नव्या आणि युवा सेनेतील काही युवा चेहऱ्यांना याच कार्यकारणीच्या विस्तारात पद देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली. आता याच कार्यकारणीच्या विस्तारानंतर नव्या जबाबदारीसह नेत्यांसोबत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागतील, असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात याच कार्यकारणीच्या विस्तारामुळे काही जणांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या काही महिला संघटक, सोशल मीडिया टीम, युवा सेना पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये अपेक्षित पदाची जबाबदारी न दिल्यानं आणि काही जणांनी पक्षात इतके वर्ष काम करूनसुद्धा नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानं मनात खदखद असल्याचं बोललं जात आहे.