मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंट वरून छगन भुजबळ यांविषयी केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिले आहे की, ” भुजबळ भाजपच्या वाटेवर ? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार ? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार ? राजकारणासाठी.. ? ” कुठे फेडाल हे पाप ? अशी पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळ स्वपक्षात एकटे पडले ?
मराठा आरक्षणाच्या विषयावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने विरोधी भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. या ठाम भूमिकेवर ते आहेत. तर काही आमदारांनी त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर ओबीसी आरक्षणासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी थेट व्यक्त केली. ” 35 वर्षापासून मी ओबीसीसाठी काम करतोय. त्यामुळे मंत्रीपदाचा सोडा आमदारकीच पण सोयरे सुतक मला नाही. ” असे परखड मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्यानंतर स्वपक्षातच ते एकटे पडले आहेत का ? अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का ? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.
मला कुठल्या पदाची हौस नाही !
दरम्यान अंजली दमानिया यांच्या या पोस्ट बाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, ” मला अजून काही माहिती नाही त्यांना कसं काय माहिती मिळाली हे मला माहिती नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षापासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे नाही. असे काही प्रपोजल मला आले नाही. असे देखील त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.