मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सुनावणी नियोजित केली होती. आज दुपारी २ वाजता सुनावणी झाली. जवळपास तीन तास आज युक्तिवाद झाला आहे. यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी होणार असे जाहीर केले होते. दरम्यान त्यात बदल करून आज 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता सुनावणी घेतली. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे विधासभा अध्यक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी सुरु झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून केवळ त्यांचे वकील उपस्थित होते.
ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या संबंधित वेळापत्रक सादर करावं असंही सांगितलं होतं. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर केलं. पण त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जी-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार असून राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.
शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी म्हटले की, सुनावणी वेळेत होईल यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आहे. आमदारांच्या वेगवेगळ्या याचिका असून त्यांची कारणेदेखील वेगवेगळी आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे सुनावणी घ्यावी असा मुद्दा मांडला असल्याचे अॅड. अनिल साखरे यांनी म्हटले. आजच्या सुनावणीत तीन अर्जांवर सुनावणी झाली. यामध्ये आमदार अपात्रतेच्या मुद्यावर एकत्र सुनावणी व्हावी, काही अधिकचे कागदपत्रे द्यायचे आहे, कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावे, ठाकरे गटाला आणखी अतिरिक्त मुद्दे त्यांना उपस्थित करायचे आहेत, या तीन अर्जांवर आज सुनावणी झाली असल्याचे अॅड. साखरे यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिंदे गटावर टीका केली. कायद्याचा किस पाडून वेळ काढला जात आहे.प्रत्येक आमदाराची सुनावणी स्वतंत्र करणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची तलवार टांगती आहे. त्यामुळे वेळकाढूपणा सुरू असल्याचे देसाई यांनी म्हटले. न्यायाला उशीर हा अन्याय केल्यासारखं आहे. सुप्रीम कोर्टातून न्याय मागावा की अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे संकेतही अनिल देसाई यांनी दिले.