सांगली : सांगलीतून काल एक खळबळजनक घटना घडली. खरंतर याचा अंदाज काँग्रेसला यापूर्वीच आला होता. आणि काँग्रेसने विशाल पाटील यांचं बंद थोपवण्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले. परंतु काँग्रेसला यात यश आले नाही आणि विशाल पाटील यांनी बंडखोरी करून लिफाफा या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय ठाम ठेवला.
सांगलीत काल लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी देखील विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे विशाल पाटील हेही निवडणूक लढवणारच हे निश्चित झालं. सांगलीमध्ये विशाल पाटील यांना मोठे समर्थन आहे. त्यांच्या समर्थनार्थ काल कार्यालयाबाहेर मोठा जमाव देखील जमा झाला होता. परंतु त्यांचा हा निर्णय त्यांना आता महागात पडू शकतो.
काँग्रेसचे नाना पटोले यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार 25 तारखेला पक्षाची बैठक घेऊन विशाल पाटील यांच्यावर काय कारवाई करायची हे ठरवले जाईल. विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून त्यांना कुणीतरी फूस लावतोय असा आरोप देखील यावेळी नाना पटोले यांनी केला आहे.