अहमदनगर : अहमदनगरमधून Ahmednagar मोठी पण अपेक्षित अशी बातमी समोर येते आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके Nilesh Lankay हे अजित पवारांची साथ सोडून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं विविध घटनांमधून स्पष्ट दिसून येत होतं.
दरम्यान काल निलेश लंके यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. परंतु लोकसभा लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सुप्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये निलेश लंके हे बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडकवली. त्यांना मतदार संघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंध घालण्यासाठी मैदानात उतरत आहे. त्यासह मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचं दुःख आहे. ती भरपाई करण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. ही लढाई लढण्यापूर्वी मुदतपूर्व राजीनामा देण्याची वेळ आली. ” हे सांगतानाच लंकेंना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांनी माहिती दिली की मुंबईत हा राजीनामा अध्यक्षांना आजच पोहोचेल. त्याचबरोबर मेलवरही पाठवत आहे. असं त्यांनी म्हटले आहे
एकंदरीतच सुजय विखे पाटील यांच्यासमोर आता निलेश लंकेयांचे अहमदनगरमधून आव्हान असणार आहे.