नवी दिल्ली : दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सकाळी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. विरोधी पक्ष केंद्रावर दोषारोप करत असून हे सूडबुद्धीने केलेले कृत्य असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, सत्ताधारी भाजपने या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते गौरव भाटिया यांनी बुधवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. गौरव भाटिया यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचाराचा फटका कट्टर प्रामाणिक अरविंद केजरीवाल यांनाही बसत आहे. आज तपास यंत्रणांनी संजय सिंह यांच्या घरावरही छापा टाकला आहे. दारु घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवाल आहे, त्यांच्या सांगण्यावरून दिल्लीत हा दारुघोटाळा झाला, हे देशाला आणि दिल्लीच्या जनतेला ठाऊक आहे. ‘अशी घणाघाती टीका भाजप नेते गौरव भाटिया यांनी केली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
भाजप नेते पुढे म्हणाले की, एक खासदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसून पैसे गोळा करतो. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ते स्वत:ला आम आदमी पार्टी म्हणवून घेत असत, पण आता हे पापी इतके खास झाले आहेत की ते दारूघोटाळे करतात आणि मग म्हणतात की, आमच्यावर कारवाई राजकीय द्वेषापोटी केली जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी ज्या व्यक्तीला कट्टर प्रामाणिक व्यक्ती असल्याचा दाखला दिला, तो कट्टर उपमुख्यमंत्री आणि कट्टर बेईमान ठरला. ही ३२ लाखांची लाच आपण घेतलेली नाही, हे नाकारण्याचे आव्हान मी तुम्हाला देतो. अशा आव्हान देखील त्यांनी दिले आहे.