मराठा आरक्षणाबाबत विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फाडनवीस यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले कि, “ओबीसीमध्ये समावेश झाल्यानं मराठा समाजाला फार लाभ होणार नाही. तसं झाल्यास मराठा समाजाला ओबीसीत केवळ तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल. मराठ्यांना जर ईडब्ल्यूएस आरक्षणातून दहा टक्के आरक्षण मिळत असेल, तर तो खूप मोठा फायदा होत आहे. परंतु, जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा करुन घेण्याची मंशा असावी. जरांगे मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा राजकीय लोकांच्या भल्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
मराठा समाजाला उगाच गाजर न दाखवता ठरल्याप्रमाणे वेळेत ओबीसीमधून आरक्षण द्या. शिवाय आणि संख्याबळ वाढवून नोंदी शोधा. मराठा आरक्षणाचा प्रश्न 24 डिसेंबरच्या आत अहवाल देऊन मार्गी लावा, नाहीतर हे प्रकरण जड जाईल, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून याविषयी दावे-प्रतिदावे देणं सुरू आहे. ओबीसीमध्ये आजघडीला 372 जाती अस्तित्वात आहेत. त्यात परत ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण घेऊन फार काही मिळणार नाही. उलट बाहेर राहून त्यांना जास्त फायदा होईल. खुल्या वर्गात फार जाती राहणार नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांचा नोकरी आणि सोयी सवलती संदर्भात फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी अभ्यास करून, विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपला भलं कशात आहे, हित कशात आहे, याचा विचार करावा. असे आवाहन देखील वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांना केले आहे.
हे वाचलेत का ? MAHARASHTRA POLITICS : राज ठाकरेंना ‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा; वाचा सविस्तर प्रकरण
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असतानाच राज्याच्या राजकारणात रोज नवे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीनं भाष्य केलं आहे. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं भविष्यात फार मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी या संदर्भात अभ्यास करावा, जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर त्यांनी सर्व काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा, असा सल्ला मराठा तरुणांना देत जरांगे पाटलांच्या भूमिकेवर वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.