मुंबई : अखेर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्ष संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये उरलेल्या जागांबाबत उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
सांगली, भिवंडी आणि मुंबईतील इतर जागांबाबत जो तिढा होता तो सुटला असून उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणता पक्ष कुठून आपला उमेदवार उभा करणार याबाबत या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे. उद्या मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी ही पत्रकार परिषद मुंबईतील मंत्रालय परिसरात असलेल्या ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात होणार आहे. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे माध्यमांशी संवाद साधणार असून संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीमध्ये थेट मैत्रीपूर्ण लढत लढण्याची देखील मागणी होऊ लागली होती. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मोठी वादळ आली. हे वादळ प्रामुख्याने सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून होते. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वतीने एकाच वेळी सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात होत. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदे वेळी सांगली बाबतचा तिढा नेमका कसा सुटला ? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.