हिंगोली : सत्ता आली नाही तर मिशा कापून टाकीन असं स्वतःलाच चॅलेंज देणारे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा स्वतःला चॅलेंज दिले आहे. नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईल असं खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
कोण आहेत संतोष बांगर !
संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार आहेत. तसेच शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख आहेत. 2019 मध्ये बांगर हे उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी घेऊन कळमनुरी मतदार संघातून निवडून आले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर ते शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत.
मारहाण, कार्यालयांची तोडफोड, अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणे अशा अनेक कारणांनी वादाच्या भवऱ्यात अडकणारे संतोष बांगर यांनी आता हा मोठा अजब दावा केला आहे. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईल असं चॅलेंज त्यांनी स्वतःलाच दिलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होणे हे संतोष बांगर यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.