मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ जाणते नेते अशोक चव्हाण यांनी आज आपल्या आमदारकीचा त्यासह पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन वादळ निर्माण झाल आहे. दरम्यान यानंतर आता अशोक चव्हाण नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार ? ते आता भाजपच्या वाटेवर आहेत का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासह वेगवेगळ्या चर्चेला देखील उधाण आलेले असताना स्वतः अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट सांगून टाकली आहे.
आज विधान भवन परिसरात अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला आपल्या राजीनाम्यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधल्यामुळे पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
काय म्हणाले अशोक चव्हाण ?
यावेळी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कुणाहीबद्दल वैयक्तिगत भावना नाही”, असे अशोक चव्हांनी स्पष्ट केले.
तसेच, “मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप ठरवलेलं नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका काय असेल ते ठरवेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, असं काही नाही. मी अनेक वर्षांपासून, जन्मापासून ते आतापर्यंत काँग्रेसचं काम केलं आहे. मला वाटतं की, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे”, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. “मी कोणत्याही आमदाराला संपर्क साधलेला नाही”, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.