मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांबाबत मोठा संभ्रम आहे. यात सर्वात वर नाव आहे ते म्हणजे सातारा… लोकसभा मतदारसंघाचे वास्तविक पाहता सातारा हा उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांनाच भाजपच्या वतीने उमेदवारी मिळेल असे चित्र असताना आणि स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आश्वासन दिले असताना अद्याप देखील या जागेचा तिढा सुटलेला दिसत नाहीये.
भाजपने आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पण या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर स्वतः मंत्री गिरीश महाजन हे साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना आश्वासित केले होते.
परंतु सध्य परिस्थितीनुसार तीन दिवसांपासून उदयनराजे भोसले हे दिल्लीमध्ये आहेत. चर्चा बैठका सुरू आहेत. भेटीगाठी सुरू आहेत. पण आता इकडे साताऱ्यामध्ये भाजपचे नरेंद्र पाटील यांनी थेट सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर आपला दावा ठोकला आहे. ते म्हणाले की, ” माझा दावा सातारा लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी अशी इच्छा आहे. ग्रामीण भागासह शहरी भाग राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. ज्यावेळी उदयनराजे समोर लढण्यासाठी कुणीही तयार नव्हतं त्यावेळी पक्षाने आदेश दिला आणि मी निवडणूक लढवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे. अशी भूमिका लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.