मुंबई : आज शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नाशिक मधून विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. दरम्यान या सेतूच्या उद्घाटनानंतर मुंबईमधील इतर अनेक प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. यामध्ये दिघा रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. दरम्यान या स्थानकाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून दिघा रेल्वे स्थानकावर सध्या वाद पेटला आहे.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मतदारसंघांमध्ये हे दिघा गाव रेल्वे स्थानक येते. हे रेल्वे स्थानक व्हावे यासाठी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केला आहे. परंतु या लोकार्पण कार्यक्रमाच्या पत्रिकेतून राजन विचारे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे संतापलेल्या राजन विचारे यांनी दिघा रेल्वे स्थानकावर वाद सुरू केला आहे.
काही वेळातच दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहेत. परंतु त्यापूर्वीच आमंत्रण न मिळालेले खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये राडा सुरू झाला आहे. तसेच भाजप आणि राजन विचारे समर्थक यांच्यामध्ये स्थानकावरच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.