नाशिक : नाशिकमध्ये महायुतीचा अद्याप देखील तिढा सुटलेला नाही. जागावाटप आणि उमेदवारी नेमकी कोणाला ? याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच आता शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक मधून हेमंत गोडसे Hemant Godse निवडणूक लढवणार असे ठाम विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवारी हेमंत गोडसेंनाच मिळणार असे जाहीर केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा वाद सुरू झाला होता. छगन भुजबळ यांनी या उमेदवारीवर आपला दावा ठोकला आहे. ते म्हणाले होते की, ” दिल्लीवरून माझ्या नावाचे चर्चा आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणूक मीच लढवणार, त्याचबरोबर नाशिकची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार अशी चर्चा देखील मध्यंतरी सुरू झाली होती. साताऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जागा भाजपच्या उदयनराजे भोसले यांना सोडल्यामुळे नाशिकची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटणार अशी चर्चा सुरू झाली होती.
मोठी बातमी : शिवतीर्थवर पोहोचले आमदार संजय शिरसाट; राज ठाकरेंसोबत तासभर चर्चा, नेमका विषय काय ? वाचा सविस्तर
या सर्व वादंगामध्ये अद्याप देखील नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. आता पुन्हा एकदा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उमेदवारी केव्हा आणि कोणाला जाहीर होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागल आहे.