महाराष्ट्र : राज्यातील ग्रामपंचायतींसाठी (5 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. यामध्ये 185 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. राज्यभरात अंदाजे 74 टक्के मतदान झालं आहे. मात्र आज राज्यातील ग्रामपंचायतीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. तसेच या निवडणुकीत सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे हा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकूण 2359 ग्राम पंचायती आहेत. त्यातल्या 1100 पेक्षा जास्त ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. शिंदे गटापेक्षा अजित पवार गट सरस ठरलाय. सर्वात मोठा फटका ठाकरे गट आणि शरद पवार गटाला बसला आहे. महायुतीने राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत बाजी मारली आहे. महायुतीने आतापर्यंत 688 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीने कसाबसा 200 चा टप्पा ओलांडला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आदी नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायतीचे निकाल रोहित पवार यांच्यासाठी धक्कादायक आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघाचे संपूर्ण निकाल जाहीर झाले आहे. रोहित पवार यांचे विरोधक राम शिंदे यांची सरशी झाली आहे. मागच्यावेळी विधानसभेला रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता.
राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ग्रामपंचायतीवर आपापल्या सत्तेचे दावे-प्रतिदावे केले आहेत.