मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित होते. दरम्यान पक्षप्रवेश झाल्यानंतर आज भाजपसोबत अशोक चव्हाण यांची पहिलीच पत्रकार परिषद होती. आणि त्यांच्या एका वक्तव्यामुळे भर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला !
तर झालं असं की, आज भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. मुंबईच्या भाजप कार्यालयात आज हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल आणि बुके देऊन त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असं जाहीर करण्यात आलं. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानताना सर्वांची नावे आणि पद व्यवस्थित उच्चारली आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाचा उल्लेख करताना ते चुकून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणाले. लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची चूक देखील दुरुस्त केली. एवढ्यात सभागृहात एकच हास्यकल्लोळ उठला.