शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाची जबाबदारी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर आली होती. एव्हढी मोठी जबाबदारी ते कशी पार पाडणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असताना उद्धव ठाकरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तोडून केवळ स्वतःच्या बळावर ६३ जागा जिंकून त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दी बाबत सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जे फार कमी लोकांना माहिती असतील अशा अनेक पैलू आपण आज जाणून घेणार आहोत.
उद्धव ठाकरेंचं बालपण
उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला. हे दीड वर्षांचे असताना खूप आजारी पडले होते. ते त्या आजारपणातून वाचतील की नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. यामुळे बाळासाहेब ठाकरे हताश झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे काका श्रीकांत ठाकरेंनी त्यांची खूप काळजी घेतली. तेव्हापासूनच उद्धव आणि काका श्रीकांत ठाकरे यांच्यामधील संबंध अधिक दृढ होत गेले. उद्धव ठाकरेंचा स्वभाव लहानपणी अतिशय शांत होता.
उद्धव ठाकरेंचं शिक्षण आणि व्यवसाय
उद्धव ठाकरेंनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सर जे.जे. कला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे मराठी वृत्त दैनिक ‘हिंदू’मध्ये पत्रकार म्हणून काम करत असे. त्यांनी ‘चौरंग’ नावाची जाहिरात संस्थाही सुरू केली होती, मात्र त्यात त्यांना हवं तसं यश आलं नाही. काही काळानंतर ती जाहिरात संस्था बंद करावी लागली.
राजकारणात रस नव्हता
वडीलांप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा देखील कलाकार म्हणूनच प्रवास सुरु झाला. उद्धव ठाकरे यांना सुरुवातीच्या काळात राजकारणात अजिबात रस नव्हता. उलट त्यांना फोटोग्राफी, लेखन आणि तत्सम कला क्षेत्रात आपला ठसा उमटवायचा होता. मात्र नशिबात वेगळंच काही लिहिलेलं होतं आणि जीवनाला कधी वेगळी कलाटणी लागली हे कळलं नाही. वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला.
छुपेरुस्तम उद्धव
लहानपणी उद्धव ठाकरे यांना बॅटमिंटन खेळण्याची आवड होती. त्यासाठी त्यांनी सरावही सुरु केला होता. मात्र एक वेळ खेळता खेळता ते अचानक पडले, हे पाहून राज ठाकरे आणि त्यांचे मित्र उद्धव ठाकरेंवर जोर जोरात हसले. या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी बॅटमिंटनचा सरावच सोडला असा सगळ्यांचा समज झाला. मात्र त्यांनी लपून दुसरं बॅटमिंटन कोर्ट बुक करून सराव सुरूच ठेवला. एवढंच नाही तर राज ठाकरे यांच्या कोचलाही गुपचूप गाठून त्यांच्याकडून स्वतःसाठी कोचिंग मिळवली आणि या खेळात त्यांनी शेवटी प्राविण्य मिळविलंच.
उद्धव ठाकरेंना ‘हे’ अजिबात सहन होत नाही
उद्धव ठाकरे हे अत्यंत मोजकं खातात आणि व्यायामाकडे पुरेपूर लक्ष देतात. लहानपणापासूनच रॉयल लाईफ जगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी जीवनात भरपूर मद्यपान वगैरे केला असेल, असा अनेकांचा समज असू शकतो. मात्र तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल…पण त्यांना दारू सहन होत नाही. याविषयी बोलताना ‘द कझिन्स ठाकरे’ या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी सांगतात, “१९९० च्या दशकात, सामनाच्या वर्धापन दिनाची पार्टी असताना अनेक मान्यवर जमले होते. लोकांनी आग्रह केला म्हणून उद्धव ठाकरेंनी शॅम्पेनचा एक घोट घेतला. तिथे उपस्थित असणारे लोक सांगतात की, त्यानंतर त्यांना मोठा ठसका लागला. त्यांना दारू अजिबात सहन झाली नाही.”
फोटोग्राफीचा छंद
एकदा पुण्यातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले होते की,”छायाचित्रण माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. कुणी काहीही म्हटलं तरी मी फोटोग्राफी सोडू शकत नाही.” उद्धव ठाकरे यांना निसर्गाचे, प्राण्यांचे, किल्ल्यांचे फोटोज कॅमेरामध्ये कैद करण्यास फार आवडते. त्यांना फोटोग्राफीचा छंद असून एरिअल फोटोग्राफी ते अतिशय उत्तमरीत्या करतात. एरिअल फोटोग्राफी म्हणजे विमानातून किंवा इतर हवाई प्लॅटफॉर्मवरून छायाचित्र काढणे. उद्धव ठाकरेंनी काढलेल्या छायाचित्रांवर त्यांनी २ पुस्तकांचं प्रकाशनही केलं आहे. त्यातील एक २०१० रोजी प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र देशा’ या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी चित्रित केलेल्या महाराष्ट्रातल्या २७ मोठ्या किल्ल्यांचे हवाई दृश्य टिपलेली आहेत. यात शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड, विशाळगड, पुरंदर, दौलताबाद हे किल्ले आहेत. तर २०११ रोजी प्रकाशित झालेल्या ‘पहावा विठ्ठल’ या पुस्तकात वारीचं दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे हे वेळ काढून त्यांचे मित्र मिलिंद गुणाजी यांच्याबरोबर फोटोग्राफी करायला जात असतात. ठाकरेंनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतः काढलेले काही फोटोज देखील शेअर केलेले आहेत. त्यांनी इन्फ्रारेड फोटोग्राफी पद्धतीने प्रतापगडचा फोटो क्लिक केला आहे. तर लोणार सरोवरचा त्यांनी काढलेला फोटो त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या फोटोग्राफीसंदर्भातील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. तसंच त्यांनी गीर, ताडोबा अभयारण्यात त्यांनी सिंहाचे फोटो क्लिक केलेले आहेत. त्याबरोबरच भटकंती करणाऱ्याचे आवडते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे हंम्पी…या शहरातील फोटोही त्यांनी त्यांच्या कॅमेरात टीपला आहे. कॅमेरा बरोबरंच आयफोनवरही त्यांनी अनेक छायाचित्र चित्रित केलेले आहेत. त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनचेही अतिशय सुंदर चित्र त्यांच्या कॅमेरात कैद केले आहेत. त्यांचं छायाचित्रावर एवढं प्रेम आहे की, त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात आकाशातून काही छायाचित्रे काढण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी देखील घेतली होती.
फोटोग्राफीतून सोशल वर्क
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनातून मिळालेले पैसे ते शेतकरी आणि गरजूंच्या मदतीसाठी देतात. त्याबरोबरच त्यांनी ‘दुर्गप्रेमी संघटने’ची स्थापना देखील केली आहे.
उद्धव ठाकरेंचा राजकारणात प्रवेश
फोटोग्राफीच्या छंदामुळे ४० वर्ष राजकारणाहून दूर राहणारे उद्धव यांनी शेवटी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत २००२ च्या बीएमसी निवडणुकीत शिवसेनेला मोठा विजय मिळवून दिला.