नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली आहे. एका बाजूला काँग्रेस आणि विरोधक अदानी समूहावर टीकास्त्र सोडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मात्र उद्योजक गौतम अदानी यांना पूरक भूमिका घेत असल्याची चर्चा सुरू असताना आज दिल्लीत झालेल्या राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतही पवारांच्या भूमिकेबाबत राहुल गांधींना प्रश्न करण्यात आला. त्यावर राहुल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“अदानींसोबत झालेल्या बैठकीबाबत शरद पवार यांना विचारणा केली का ? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले कि, “मी शरद पवार यांना हा प्रश्न विचारला नाही. शरद पवार हे भारताचे पंतप्रधान नाहीत आणि ते अदानींचा बचाव करत नाहीत. पवार पंतप्रधानपदावर असते तर मी प्रश्न विचारला असता. सध्या पंतप्रधानपदावर मोदी असून ते अदानींचा बचाव करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांचे चांगलेच संबंध आहेत. पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती मध्ये शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या मेहनतीचे कौतुक केले होते. अदानी यांनी जून महिन्यात पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.