पुणे : पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवार यांची वर्णी लागली. तरीही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील विकास कामांचा आढावा घेणे सुरू ठेवले आहे. पालकमंत्री पद गेलं असलं तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांना समजावले आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्या हातून जाऊन अजित पवार यांना नियुक्त करण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्यांनाच पदे मिळणार असतील तर या पुढील काळात जिल्ह्यात पक्ष वाढणार कसा ? असा प्रश्न अनेकांनी यावेळी उपस्थित केला.
अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याबाबत भाजपमधून विरोध होता. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो तरी कायद्यान्वये सह-पालकमंत्री आहोत. दर दोन महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केल आहे. शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. आमदार देखील पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू ठेवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.