बारामती : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त गाजणार आहे ती बारामती मतदार संघाची निवडणूक… ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी राजकीय तर आहेच, त्याचबरोबर ती आता कौटुंबिक झाली आहे. या वादामध्ये आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी देखील अजित पवार आणि भाजपवर सडेतोड टीका केली आहे.
ज्या दिवशी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती फूट राजकीय होती. परंतु त्यानंतर सातत्याने होणाऱ्या टीकाटिप्पणी आणि बारामतीमध्ये लोकसभा मतदार संघामध्ये आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी या राजकीय लढायीस कौटुंबिक लढाईमध्ये परिवर्तित करते आहे. या राजकीय लढाईमध्ये अजित पवारांची संपूर्ण कुटुंबान साथ सोडली आहे. त्यांचे स्वतःचे सख्खे भाऊ ,बहिणी यांच्या सह आता शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी देखील अजित पवारांना खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरोबर भाजपवर देखील गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या सरोज पाटील
सरोज पाटील या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बहिण आहेत. त्या म्हणाल्या की, ” भाजपला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे, आणि सुनेत्राला निवडून आणायच आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना वाटतं. पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजितने काम केलं आहे. अजित काम करतो, पण या सगळ्याचा पाया शरदने घातला आहे. पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते शरद ही तुझी मतं तुझी नाहीत… ही मत तुझ्या आई वडिलांची आहेत. तुझ्या आई-वडिलांनी सामाजिक पाया घातला आहे. त्यामुळे तू तुझी मतं मिळव. शरदने प्रचंड काम केलं आहे. त्यामुळे तो पडणार नाही. असा भक्कम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.