पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डेक्कन परिसरामध्ये भाजप नेते निलेश राणे BJP leader Nilesh Rane यांची व्यावसायिक जागा आहे. या व्यावसायिक जागेवर त्यांच्या मॉलवर सध्या 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी असल्याचं महानगरपालिकेने सांगून कारवाई केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे
पुणे महानगरपालिकेने ही कारवाई केल्यानंतर निलेश राणे म्हणाले की, ” महानगरपालिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात गैर काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर त्याची वेगळी बातमी झाली असती, आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार आहे. ” असं राणेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान पुणे महानगरपालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोट्यावधींचे कर थकबाकीदारांनी रेंगाळवले असल्याचं चित्र आहे. महानगरपालिकेने म्हटलं आहे की, अशा कारवाया करत असताना आधी नोटीस पाठवली जाते. त्यानंतर कारवाई केली जाते. महानगरपालिकेने म्हटलं आहे की, निलेश राणे यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. डेक्कन मधील या तीन मजली मॉलमध्ये अनेक दुकानं आहेत. या मॉलची दुकानदारांनी देखील थकबाकी देणे आहे. एकूण थकबाकी ही पाच कोटी साठ लाख रुपये आहे. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केली. दरम्यान पुणे महानगरपालिकेने आत्तापर्यंत 1983 कोटी कर वसुली केली आहे.