यवतमाळ : यवतमाळ वाशिममधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजीत राठोड यांचा अर्ज बाद झाला आहे. वंचित बहुजन आघाडीला हा मोठा धक्का समजला जातो आहे.
महाविकास आघाडी सोबत ताटातूट झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे चा नारा दिला. आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक मतदारसंघातून आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान यवतमाळ मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिजीत राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यांचा अर्ज बाद झाल्याने आता वंचित बहुजन आघाडी समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी आढळल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांनी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी त्यांच्या ऐवजी अभिजीत राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान आता राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. तर अर्ज दाखल करण्याची काल चार एप्रिल रोजी शेवटची तारीख होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला हा मोठा धक्का समजला जातो आहे.