वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. महायुतीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेने एक पत्रकार परिषद घेऊन रामदास तडस आणि तडस कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहे.
नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली असून ही पत्रकार परिषद शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या मदतीने घेण्यात आली. यावेळी रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप करून थेट अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे.
येत्या 20 तारखेला रामदास तडस यांच्या प्रचारासाठी सभा बोलवण्यात आली असून या सभेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. यावेळी मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि माझ्या मुलाला न्याय द्यावा असं पूजा तडस म्हणाले आहेत.
तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप
यावेळी पूजा तडस यांनी रामदास तडस आणि तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, ” मला मूल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की हे बाळ कोणाचं ? या बाळाची डीएनए टेस्ट करा. मला रॉडने मारहाण देखील करण्यात आली. लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं. मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यापासून बाळाचा जन्म झाला. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करा. मी मुलाला बेदखल केलं. मुलाला घरातून काढलं नाही. मग मला एकटीलाच का काढलं घराबाहेर ? मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा. मला दोन वेळच अन्न ही दिल जात नाही. ” असे मोठे आरोप पूजा तडस यांनी केले आहेत.
नुकतीच नागपूरमध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावर आता रामदास तडस काय बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.