बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील ‘पवार विरुद्ध पवार विरुद्ध शिवतारे’ अशी तिहेरी लढत होणार असे चित्र होते. बारामतीवर पवारांचीच मक्तेदारी का ? ही निवडणूक लढवणारच ! अशी भूमिका शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे Vijay Shivtare यांनी घेतली होती. दरम्यान बुधवारी रात्री शिवतरे यांनी तलवार म्यान केली आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तीनही पक्षाचे प्रमुख नेते अर्थात भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट समजले नसलं तरी गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कडाडून टीका करणारे विजय शिवतारे यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट केल आहे. त्यामुळे आता बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे.
विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विजय शिवतारे आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उतरणार असल्याच देखील समजते आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू असं विजय शिवतारे यांनी म्हटले, त्यामुळे एकंदरीतच साताऱ्यानंतर आता बारामतीचा देखील पेच सुटल्याचं दिसून येते आहे.