मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खास भेट दिली आहे. ही खास भेट आहे बाबरी मशीद जेव्हा पाडली गेली तेव्हा स्वतः बाळा नांदगावकर हे देखील तिथे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी मशीद पाडल्यानंतर तिथून दोन विटा देखील ते घेऊन आले होते. यापैकी आज एक वीट त्यांनी राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर
ही भेट देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, ” तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या, ३२ वर्षे झाली राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात ! त्यावेळी काय सुचलं माहिती नाही. पण मी बाबरीची वीट सोबत आणली होती. मी माजगावमध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कार्यालया खाली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधवकडे आहे. असो हरकत नाही, तो माझा जुना सहकारी आहे. ” अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.
काय म्हणाले राज ठाकरे
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ” बाबरी पाडली तेव्हा त्यातून ही एक वीट बाळा नांदगावकरांनी आणली होती. विटेचे वजन बघून समजेल की किती मजबूत आहे. तेव्हाच कन्स्ट्रक्शन चांगलं होतं. कारण तेव्हा कंत्राट निघत नव्हती. हा बाबरी मशीद पाडली त्याचा पुरावा आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यातीलही एक वीट मला आणायची आहे. ” अशी भावना राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
6 डिसेंबर 1992 ला बाबरीचा ढाचा पाडला गेला होता. यावेळी जे शिवसैनिक अयोध्येत गेले होते त्यामध्ये बाळा नांदगावकर हे देखील होते. यावेळी बाळा नांदगावकरांनी दोन विटा तिथून आणल्या होत्या. यापैकीच आज एक वीट राज ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे.