नाशिक : या लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Elections सर्वात जास्त गाजला तो म्हणजे बारामती, सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ…अर्थात उमेदवारी नेमकी कुणाला दिली जावी यावरून जो तिढा होता तो सुटण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांच्या नाराजी नाट्याला महायुतीला सामोरे जावे लागल आहे. दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आता हेमंत गोडसे यांनाच मिळणार यावर शिक्कामोर्त झालं असल्याची माहिती मिळते आहे.
Actress Rupali Ganguly : ‘अनुपमा’चा BJP मध्ये पक्षप्रवेश; लोकसभा निवडणूक लढवणार का? वाचा सविस्तर
आज महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत उमेदवाराच्या नावाची घोषणा होणारी याबाबत संकेत दिले होते. त्यानुसार आता महायुतीचा उमेदवार निश्चित झाला असून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं. याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. हेमंत गोडसे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. तर मंत्री छगन भुजबळ देखील या जागेसाठी प्रचंड आग्रही होते. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं होतं. पण त्यानंतर देखील लगेचच हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तक झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आणि भाजपने देखील या जागेसाठी बरेच प्रयत्न केले. पण अखेर आता हेमंत गोडसे यांच्याच नावावर सर्वांनी सहमती दिली असून आता नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे अशी लढत होणार आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाशिकच्या जागेवर आपला दावा ठोकला होता. परंतु जागावाटप आणि उमेदवार घोषित करण्यास होत असलेला विलंब पाहता त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीतून माघार घेतली होती. दरम्यान हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. यावर स्वतः छगन भुजबळ यांनी भाष्य केल आहे. ते म्हणाले हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचे मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल असे देखील भुजबळ म्हणाले आहेत.