बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात नेतेमंडळी एकमेकांवर तोफ डागत आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी आपल्या तोफेचे तोंड हे विजय शिवतारे यांच्या दिशेने वळवत घणाघाती टीका केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, ” लोकसभेच्या किती जागा मिळतील आणि कुणाकुणावर जबाबदारी दिली जाईल हे बैठकीनंतरच समजेल. बारामतीत पवारांची मक्तेदारी मोडून काढण्याचा विडा उचलण्याच वक्तव्य करणाऱ्या शिवतारे यांचं डिपॉझिट वाचणार नाही. अजित दादांना बोलून त्यांना असुरी आनंद घ्यायचा असेल तर तो घ्यावा, मुळात शिवतारेची एवढी औकात नाही की तो एवढा बोलेल. शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच आहे. बारामतीत ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो मास्टरमाइंड कोण आहे हे जनतेसमोर आणू, तोवर काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवा. ” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
मिटकरींच्या या गौप्यस्फोटानंतर आता खरंच जर विजय शिवतारे यांच्या मागे दुसरी राजकीय शक्ती असेल तर ती नेमकी कोणती ? अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.