मुंबई : आज 10 ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सध्या परिस्थितीत घेतलेला निर्णय आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कामकाजाबाबत जनतेला स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीची जोरदार चर्चा रंगलेली असताना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. 2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1711635589320335793?s=20
दरम्यान या पत्रामध्ये अजित पवार यांनी आपल्या निर्णयाच्या शंभर दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात या आधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, असे निर्णय त्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार मध्ये सामील झाला. असे या पत्रात लिहिले आहे.
त्याचबरोबर प्रत्येक काळ आणि त्या काळातील आव्हानं वेगवेगळी असतात. त्या आव्हानांचा सामना करत लोककल्याणासाठी लोकप्रतिनिधींना काम करावं लागतं. आपण लोकांचे देणे लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिल आहे. या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या विविध समाज घटकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेतून कार्यरत असल्याची प्रचिती मी व माझ्या सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. राजकारणाच्या पलीकडे असणाऱ्या भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर राज्य सरकारला काम करावं लागतं. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून हे काम अधिक जोमाने करेल असं देखील या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे.