जालना : एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच ! असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईला धडकी भरेल असं आंदोलन जालन्याच्या अंतर्वली सराटी पासून मुंबई पायी यात्रा काढून केलं गेलं. थोडेथोडके नाही तर तब्बल तीन कोटी मराठा आंदोलन मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश जरांगे पाटील यांच्या हातात देऊन सर्व मागण्या मान्य असल्याचं जाहीर केलं. दरम्यान आता धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी नवीन लढा मनोज जरांगे पाटील उभारण्याच्या तयारीत आहेत.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ” मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे. एकदा हा प्रश्न सुटला की धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाही तेच बघतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे. एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या, त्यानंतर मी मोकळाच आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे याबाबत त्यांनी देखील म्हटलं पाहिजे. त्यांनी एकदा म्हटलं की मग पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही. ” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.