भारतातील चित्त्यांचा ऱ्हास झाल्यानंतर सरकारने विदेशातून चित्ते भारतात आणण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे भारताबाहेरून चित्ते मध्यप्रदेशातील राष्ट्रीय अभयारण्यात आणले देखील. पण गेल्या काही महिन्यात या चित्त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत भारतात आणलेले ७ चित्ते मरण पावले आहेत. हे नेमकं कशामुळे घडतंय ? जितका गाजावाजा करत या चित्त्यांना भारतात आणलं जातं तितकी त्यांची काळजी घेतली जाते का? त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत.
या चीत्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय पाहुयात सविस्तर..
भारतात परदेशातून चित्ते का आणले?
१९४८ मध्ये भारतातील शेवटच्या चीत्याची छत्तीसगढमध्ये शिकार करण्यात आली होती. त्यानंतर १९५२ मध्ये भारत सरकारने अधिकृतरित्या भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं जाहीर केलं. तेव्हापासून भारतात चित्ते नव्हते. २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतात बाहेरून चित्ते आणण्याची परवानगी दिली. त्यानंतर भारतात चित्ते कसे आणायचे याचा २ वर्ष अभ्यास करण्यात आला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातील चित्यांची प्रजाती नष्ट झाल्यानंतर तब्बल ७० वर्षांनी भारतात विदेशातून चित्ते आणण्यात आले. साऊथ अफ्रिकेतील नामिबियामध्ये जगात सर्वात जास्त प्रमाणात चित्ते आढळतात म्हणून नामिबियामधून सुरुवातीला ८ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला म्हणजे १७ सप्टेंबर २०२२ ला आणण्यात आले. त्यावेळी कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना उतरविण्यासाठी ६ हेलिपॅड तयार करण्यात आले होते. त्यावेळी आणलेल्या ८ चित्त्यांपैकी ५ मादी आणि ३ नर होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये आणखी १२ चित्ते आफ्रिकेतून आणण्यात आले.
भारतात आणलेल्या या चित्त्यांचा मात्र वेगवेगळ्या कारणाने मृत्य होत असल्याचे गेल्या काही महिन्यात दिसत आहे.
वर्षभरात ७ चित्त्यांचा मृत्यू
११ जुलैला मध्यप्रदेशच्या श्योपुर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय अभियारण्यात ‘तेजस’ हा विदेशातून आणलेला चित्ता मरण पावला. तेजस ४ वर्षाचा नर चित्ता होता. तेजसला इतर २० विदेशी चित्त्याप्रमाणे आफ्रिकेतून आणलं होत. तेजस आपल्या वातावरणात रुळला अशी सर्वांची समजूत होती. मात्र केवळ ५ महिनेच तो भारतात जगू शकलाय.
कुनोचे ज्येष्ठ वनाधिकारी जे. एस. चौहान यांचं म्हणणं आहे की, तेजसचा मृत्यू इतर हिंस्र प्राण्यांसोबत भांडणामुळे झाला असल्याची शक्यता आहे. सकाळी ११च्या सुमारास देखरेख करणाऱ्या पथकाला तेजसच्या मानेवर जखम दिसल्या होत्या. त्यांनी पालपूर मुख्यालयातील प्राण्यांच्या डॉक्टरांना ही माहिती दिली. माहिती कळताच डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन तेजसची तपासणी केली आणि जखम गंभीर असल्यामुळे तेजसला बेशुद्ध करून उपचारासाठी पाठवण्यात आले होते. आणि दुपारी २ च्या सुमारास तेजस मृत झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलयं.
यापूर्वी २७ मार्चला विदेशातून आणलेल्या पहिल्या चित्याचा मृत्यू झाला होता. ती मादी चित्ता असून तीच नाव साशा होतं. साशाचा मृत्यू मूत्रपिंड खराब होऊन झाल्याचं सांगण्यात आलंय.
त्यानंतरचा दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू २३ एप्रिलला झाला. हा मृत्यू उदय या नर चित्त्याचा होता. त्याचा मृत्यू कार्डिओपल्मोनरी फेल्युअरने या आजाराने झाल्याचं सांगण्यात आलंय.
त्याच्या पाठोपाठ ९ मे रोजी दक्षा या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. दक्षाला चित्त्यांची प्रजाती वाढविण्यासाठी भारतात आणलं होतं. दक्षाच्या मृत्यूचं कारण, चित्त्यांमध्ये झालेली झुंज सांगण्यात आलय.
ज्वाला या मादी चित्त्याने ४ पिलांना जन्म दिला होता. त्यातल्या एकाचा २३ मे रोजी तर २ पिलांचा २५ मे रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत कुनोमध्ये ४ मोठे चित्ते आणि ३ शावक मरण पावलेत.
तेजसच्या मृत्यूनंतर कुनो पार्कमध्ये १६ प्रौढ चित्ते आणि १ शावकच उरलेय. वन्यजीव तज्ज्ञांनी वारंवार होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे.
चित्त्यांचा मृत्यू कशामुळे?
सध्याची स्थिती पाहता विदेशी चित्त्यांना भारतात कुठल्या अडचण येतेय? विदेशातून आणलेल्या चित्यांना भारतीय वातावरणात राहणं अवघड का जातंय ? वनाधिकारी सरकारच अपयश लपवण्याचा प्रयत्न करताय का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण या सगळ्यांमध्ये भारतातून पुन्हा एकदा चित्ते नामशेष होऊ नये अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.