पश्चिम बंगाल म्हणलं कि, पश्चिम बंगालची स्वतःची एक वेगळी संस्कृती, त्यांचा विशेष पेहरावा, गोड अशी भाषा, प्रसिद्ध मिष्टी, दुर्गा पूजा, चित्रपटसृष्टीत असलेला योगदान या सगळ्या गोष्टी पूर्वी डोळ्या समोर येत होत्या. मात्र आता पश्चिम बंगाल म्हटलं की, जाळपोळ, हिंसाचार, बंदूका, गोळ्या, बॉम्ब, गुंडगिरी आदी गोष्टीच डोळ्यासमोर येतात. याला कारण ठरतंय पश्चिम बंगालच्या निवडणुका. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगाल आणि हिंसाचार हे जणू समीकरणंच झाल्याचं दिसतंय. नुकतंच ८ जुलैला पश्चिम बंगालमध्ये पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीदरम्यान पुन्हा भयंकर हिंसाचार झाला आहे.
पश्चिम बंगाल हिंसाचार काय आहे?
कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळातील हिंसाचाराचे वातावरण लक्षात घेत ११ जुलैला निकाल लागल्यानंतर पुढील १० दिवसासाठी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याचे आदेश दिले होते.
८ जुलैला पश्चिम बंगालमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. दरम्यान बोगस मतदान, मतदान केंद्र अनधिकृतरित्या ताब्यात घेणं, मतदारांना मत देण्यास सक्ती करणे, गुंडगिरी, आदी गोष्टींमुळे जाळपोळ, हाणामारीच्या घटना घडल्या. यावेळी काही ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या झाडून, बॉम्ब टाकून हिंसाचार करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सरकारी आकडेवारीनुसार या हिंसाचारात विविध राजकीय पक्षाशी संबंधित एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १० मृत्यू हे सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. एकूण मृतांचा आकडा १८ असून १२ हुन अधिक लोक जखमी असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश मृत्यू हे बंदुकीची गोळी आणि बॉम्ब स्फोटामुळे झाल्याचं समोर आलेलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये कुठं घडला हिंसाचार?
८ जुलैचा हिंसाचार तसा पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र झाला आहे. मात्र ७ जिल्ह्यांमधे हा हिंसाचार तीव्र दिसून आला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक हिंसाचारच्या घटना पहायला मिळाल्या आहेत. या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या गावात एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कूचबिहार आणि दिनहाटा या परिसरात हिंसाचाराच्या बाबतीत मुर्शिदाबादनंतर तीव्र हिंसाचार झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर कोलकात्यापासून जवळ असलेल्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात जवळपास १२ हुन अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच मालदा येथे २ आणि पूर्व बर्दवान येथे २ जणांचा मृत्यू झाला आहे. नादिया जिल्ह्यात गोळी लागून २ मृत्यू झाले. नादिया जिल्ह्यात सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात बॅलेट बॉक्स पळवून मारहाण झाली. परिणामी याठिकाणी गोंधळ उडाला आणि जवानांनी हवेत गोळीबार करून जमाव पांगवला.
हिंसाचाराला जबाबदार कोण?
पश्चिम बंगालचे राज्य निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा यांनी म्हटलं की, “कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, निवडणूक आयोगाचे काम संपूर्ण यंत्रणा हाताळण्याचे आहे.”
राजीव यांनी पत्रकारांना माहिती दिली की, “केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान थोडं आधी राज्यात पोहोचले असते तर हिंसाचाराला आळा घालता आला असता. शनिवारी (मतदानादिवशी) दुपारपर्यंत केंद्रीय दलाच्या केवळ 660 कंपन्या राज्यात पोहोचल्या होत्या.”
उच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ८२२ केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्यांची मागणी केली होती. मात्र त्यांना केवळ ६६० कंपन्या मिळाल्या. त्यापैकी ३०० केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या उशिरा आल्या, ही एक त्रुटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
राजकीय विश्लेषक समीरन पाल म्हणतात, “निवडणूक आयोगावर CRPF तैनातीच्या नियोजनात दिरंगाई केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याशिवाय, संवेदनशील मतदान केंद्रांची ओळखही शेवटच्या क्षणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे तिथे सुरक्षा दल पोहोचवण्यातही उशीर झाला.”
हिंसाचारानंतर आरोप-प्रत्यारोप
८ जुलैला झालेल्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. परिणामी पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्य निवडणूक आयोग तृणमूल काँग्रेसच्या इशाऱ्यांवर काम करत असून आयोगाने संवेदनशील भागात जवानांना परिस्थिती नियंत्रणासाठी ठेवलं नाही म्हणून हा हिंसाचार झाल्याचा आरोप भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट या विरोधी पक्षांनी केला आहे. या हिंसाचारानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि पश्चिम बंगालचे मंत्री शशी पांजा म्हणतात, “राज्यातून हिंसक घटनांच्या बातम्या येत आहेत. भाजप, CPM आणि काँग्रेस यांनी संगनमताने केंद्रीय दलांची मागणी केली होती. TMC चे लोक मारले जातायत तेव्हा हे जवान कुठे आहेत कुठं होते?”
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टिका केली आहे की, “TMC चे गुंड उघडपणे मतदान केंद्र ताब्यात घेत आहेत. मतदारांना धमक्या देतात. पक्षाने जनमत चोरलंय.”
विरोधी पक्ष नेते शुभेंदु अधिकारी म्हणाले की, “सध्याच्या राज्य सरकारकडून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रपती राजवट किंवा घटनेच्या कलम 355 नुसारच निवडणुका शक्य आहेत.”
पश्चिम बंगाल हिंसाचाराचा इतिहास
२००३ च्या पंचायत निवडणुकीत ७० जण, २००८ मध्ये ३६, २०१३ मध्ये ३९ तर २०१८ मध्ये २५ पेक्षा अधिक जण हिंसाचारात मरण पावल्याची आकडेवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सादर केली आहे. राज्यात ममता यांचं सरकार येण्यापूर्वीच्या काळात निवडणुकांदरम्यान किती लोकांचा मृत्यू झाला होता यावरुन त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
२०१८ साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला होता. जेष्ठ पत्रकार तापस मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनूसार, “बंगालमध्ये निवडणूक हिंसाचाराचा मोठा इतिहास राहिला आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात, बंगालच्या राजकीय विश्वात तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे अस्तित्व नव्हतं. तेव्हा डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात वारंवार हिंसाचार व्हायचा. जेव्हा-जेव्हा सत्ताधारी पक्षाला विरोधकांकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागतो तेव्हा निवडणूक हिंसाचाराच्या घटना झपाट्याने वाढतात”.