बंगळुरु : २०२४ ला होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी विरोधी पक्षासहित सत्ताधारी पक्षानेही सुरु केली आहे. देशभरातील विरोधक आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध एकत्र आले असून गेल्या काही महिन्यांपासूनच त्यांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघटित होण्यास सुरवात केलेली आहे. देशातील तब्बल २६ विरोधी पक्षांची बंगळुरु येथे काल (१८ जुलै) बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीला INDIA नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हजेरी लावून शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा सहभाग नोंदवला आहे.
INDIA काय आहे?
देशातील तब्ब्ल २६ विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वात १८ जुलैला बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत NDA विरुद्ध देशातील तब्बल २६ विरोधी पक्षाच्या नव्याने संघटित आघाडीला ‘इंडिया’(INDIA) असे नाव देण्यात आले, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं आहे. आता देशात आगामी लोकसभा निवडणुकीत INDIA Vs NDA अशी लढत राजकारणात पाहायला मिळणार आहे. ‘इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्कुसिव्ह अलायन्स‘ हे ‘INDIA‘ चे संक्षिप्त रूप आहे.
I – Indian
N – National
D – Democratic
I – Inclusive
A- Alliance
‘INDIA’ ची पुढची म्हणजेच तिसरी बैठक मुंबईला होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
देशाला कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणं हेच INDIA चं ध्येय : मल्लिकार्जुन खरगे
विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “ईडी, सीबीआय या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप देशातील विरोधकच नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं करून ते भारताची लोकशाही आणि संविधान संपवायचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासाठी देश महत्त्वाचा असून त्यासाठीच आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. देशाला कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणं हेच INDIA चं ध्येय आहे.”
“देशातील २६ विरोधी पक्षांना एकत्र पाहून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाबरले आहेत. घाबरून मोदींनी आता NDA ची बैठक बोलावली असून यात त्यांनी ३० पक्षाला निमंत्रण दिल आहे. मात्र हे ३० पक्ष कोणते, त्यांची नावं काय, त्यांची निवडणूक आयोगात नोंदणी देखील आहे कि नाही याची माहिती नाही आहे. मोदीजी त्या सगळ्यांना भेटत आहेत. कारण ते आम्हाला घाबरले आहेत”, असं देखील खरगे यावेळी बोलताना म्हणाले.
आम्ही भारतासाठी लढत आहोत, ही लढाई कुटुंबासाठी नाही : उद्धव ठाकरे
विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे माज़ी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “INDIA मुळे देशातील हुकूमशाहीच्या विरुद्ध दिशाची जनता एकत्र येत आहे. अनेकांनी मला प्रश्न विचारले, वेगवेगळ्या विचारांचे लोक असून एकत्र कसे? मात्र यालाच तर लोकशाही म्हणतात. जिथे विविधता एकत्र आणि स्वतंत्र पहायला मिळते. आम्ही भारतासाठी लढत आहोत, ही लढाई कुटुंबासाठी नाही. मात्रं देश हाच आमचं कुटुंब आहे. स्वातंत्र्य धोक्यात आलं असून आमची लढाई त्याविरोधात आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही यशस्वी होऊ. देशाच्या जनतेला आम्ही विश्वास देतो की, तुम्ही घाबरु नका, आम्ही आहोत. कारण एक व्यक्ती किंवा एक पक्ष म्हणजे देश नसतो तर, देशाची प्रत्येक व्यक्ती म्हणजे देश असतो.”
रेल्वे, विमानतळ असो की जहाज त्यांनी सगळं विकुन खाल्लं : अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “नऊ वर्षांपूर्वी मोदीजींना देशाच्या जनतेने संधी दिली मात्र या काळात त्यांनी एकाही क्षेत्राला सुधारलं नाही. रेल्वे, विमानतळ असो की जहाज सगळं त्यांनी विकुन खाल्लं. एवढंच नाहीतर त्यांनी पृथ्वी, आकाश सर्व विकून खाल्लं. परिणामी देशात आज सगळी जनता दु:खी आहे. पण आता आम्ही सर्वजण एकत्र झालेलो आहोत.”