Kota Students Suicides: राजस्थानच्या कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या नेहमीच येत असतात. अभ्यासाच्या दडपणाखाली येथे विद्यार्थी सतत मरत आहेत. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने कंटाळून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमध्ये परीक्षा घेण्यास बंदी घातली आहे. सध्या ही बंदी दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
रविवारी २४ तासांच्या अंतराने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशाप्रकारे या वर्षी जानेवारी ते 28 ऑगस्टपर्यंत 24 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 13 विद्यार्थी दोन-तीन महिन्यांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कोटा येथे आले होते. दीड ते पाच महिन्यांपूर्वी सात विद्यार्थ्यांनी कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला होता. याशिवाय आत्महत्येच्या प्रयत्नाची दोन प्रकरणेही समोर आली आहेत.
एएसपी भागवतसिंग हिंगड यांनी सांगितले की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लातूर (महाराष्ट्र) येथील आविष्कार संभाजी कासले (१६) याने कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तळवंडी परिसरात हा विद्यार्थी ३ वर्षांपासून राहत होता. तो येथे NEET ची तयारी करत होता. रविवारी तो रस्ता क्रमांक एक येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेला बसण्यासाठी आला होता.
आदर्श (18) हा रविवारी सायंकाळी 7 वाजता कुन्हडी येथील लँडमार्क परिसरात त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आदर्श हा बिहारमधील रोहिता जिल्ह्यातील रहिवासी होता. विद्यार्थी NEET च्या तयारीसाठी 4 महिने आधीच कोटा येथे आला होता. येथील लँडमार्क परिसरात तो भाऊ आणि बहिणीसोबत फ्लॅटमध्ये राहत होता.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे ताण हे सर्वात महत्त्वाचं कारण समोर आलंय. पण या ताणाल जवाबदार कोण? या आत्महत्येसाठी फक्त विद्यार्थी जवाबदार नसून तेथील कोचिंग क्लासेस मध्ये सुरु असलेली आपापसातली स्पर्धा, हॉस्टेल व पीजीमधील वातावरण, व जाहिरातींच्या लोभापायी या उणिवा समोर न आणणारी प्रसारमाध्यमंही जबाबदार आहेत.
या शहरात देशभरातून १५०,००० हून अधिक विद्यार्थी दरवर्षी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येथे येतात. कोटा हे शहर देशातील प्रमुख कोचिंग हब आहे ज्याला “भारताचे कोचिंग कॅपिटल” म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांमुळेच कोटामध्ये रोजगारनिर्मिती आहे. एका मुलावर वर्षभरात चार लाख रुपये खर्च होतात. कोटा मध्ये अडीच लाख विद्यार्थी राहतात. काही मुलांचे पालकही त्यांच्याबरोबर इथे राहतात. विद्यार्थ्यांशिवाय कोटा या शहराची कल्पनाही करता येणार नाही.