Pingali Venkayya : आपल्या देशाची शान असणारा तिरंगा, स्वातंत्र्यदिन असो किंवा मग प्रजासत्ताक दिन असो…देशात सर्वत्र राष्ट्रीय उत्सव साजरा करताना जी गोष्ट सर्वात महत्वाची असते ती म्हणजे अभिमानाने फडकणारा तिरंगा. ज्या तिरंगाच्या सन्मानासाठी आपले सैनिक युद्धात हसत हसत शहिद होतात, तो भारताचा अभिमान असलेला हा तिरंगा कसा बनला?तिरंगाच्या रचनाकाराचा शेवट कसा झाला ? हे तुम्हाला माहित आहे का? वाचा या विषयीच संपूर्ण माहिती देणारा हा महाटॉक्सचा खास लेख.
तिरंगाचे रचनाकार
या तिरंग्याच्या रचनाकाराचे नाव आहे पिंगाली वेंकय्या. २ ऑगस्ट १८७६ ला आंध्रप्रदेशच्या मच्छलीपट्टम इथल्या भतलामपेनूमारू येथे त्यांचा जन्म झाला होता. वडिल हनुमंतरायुडू आणि आई वेंकटरत्नम्मा या तेलुगू ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी मछलीपट्टणमच्या हिंदू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांचं बालपणही इथेच गेलं. पुढे त्यांनी मद्रासमधून हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून केंब्रिज विद्यापीठ गाठलं. पिंगाली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते.
त्याबरोबरच ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना ‘डायमंड वेंकय्या’ हे टोपणनाव देण्यात आले होते. त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना ‘कॉटन वेंकय्या’ नावानेही ओळखले जायचे. त्यांना उर्दू आणि जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या. वयाच्या १९ व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
महात्मा गांधी आणि वेंकय्या यांची भेट
दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान ते लष्करात असताना महात्मा गांधींसोबत त्यांची भेट झाली होती. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते. गांधीजींना भेटून ते इतके प्रभावित झाले की ते कायमचे भारतात परतले आणि स्वातंत्र्यलढ्यात सामीलही झाले.
तिरंगाची कल्पना आणि रचना
देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असून त्यांनी महात्मा गांधींना आपला स्वतःचा राष्ट्रध्वज असावा असं सांगितलं होतं. यावर गांधीजींनी पिंगाली यांना राष्ट्रध्वजाची रचना करण्यास परवानगी दिली. भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा या सगळ्या गोष्टींचा भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगाली वेंकय्या यांनी सखोल अभ्यास करून तिरंगा साकारला होता. पिंगाली वेंकय्या यांनी १९१६ ते १९२१ या ५ वर्षात जगभरातील ३० देशांच्या ध्वजांचा अभ्यास केला. यानंतर १९२१ मध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याची रचना केली. त्यानंतर १९३१ मध्ये या रचनेला मंजुरी देण्यात आली.
३१ मार्च १९२१ मध्ये पिंगाली वेंकय्या यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला होता. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा झेंडा सादर केला होता. तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला होता. अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचं जाहीर केले.
तिरंग्याचा अर्थ
शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगाचा बनलेल्या ध्वजाचा अर्थ लावण्यात आला.
वेंकय्या यांची इच्छा अपूर्णच
वेंकय्या यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५ वर्ष जीवतोड मेहनत घेतली. आपल्या भारताचा तिरंगा दिल्लच्या लाला किल्ल्यावर फडकताना पाहण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. मात्र त्यांच्या कुटूंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून ते दिल्लीला जाऊन त्यांनीच बनवलेला तिरंगा फडकताना पाहू शकले नाही आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. ही अर्धवट इच्छा मनात घेऊन वयाच्या ८६ व्या वर्षी (४ जुलै १९६३) पिंगाली वेंकय्या यांचा मृत्यू झाला.
वेंकय्या यांच्या आयुष्याचा शेवट
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पिंगाली वेंकय्याच्या घरची गरिबी इतकी होती की त्यांचा धाकटा मुलगा चलपती राव उपचाराविना मरण पावला. पिंगाली यांचाही झोपडीत मृत्यू झाला. पिंगाली वेंकय्या यांनी ४ जुलै १९६३ रोजी चित्तनगर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या त्यांच्याजवळ आणि झोपडीत एक रुपयाही सापडला नाही. ब्रिटिश सैन्यात सेवेसाठी त्यांना दिलेल्या जमिनीवर ही झोपडी बांधण्यात आली होती.
वेंकय्या यांची शेवटची इच्छा(Pingali Venkayya)
अखेरच्या श्वासापर्यंत वेंकय्या यांच्या ध्यानीमनी केवळ तिरंगाच होता. दिल्लीच्या लाला किल्यावर फडकणारा तिरंगा त्यांना पाहता नाही आला. याची त्यांना सतत खंत वाटत होती. किमान त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून आणावे आणि अंतिम संस्कार होईपर्यंत ध्वज झाडाला बांधावा, अशी त्यांची शेवटची इच्छा होती.
वेंकय्या यांच्या स्मरणार्थ
वेंकय्या यांच्या मृत्यूनंतर २००९ साली म्हणजे जवळपास ४ ते ५ दशकांनी भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते. त्यानंतर २०११ साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे.