भारतीय महिला जगभरात अपल्या कामाची छाप उमटवताना अनेकदा दिसतात. नुकत्याच जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या यादीत जगातील १०० सर्वात श्रीमंत आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या महिलांमध्ये (Richest self-made women) मुळच्या भारतीय असणाऱ्या (Indian origin) ४ महिलांचा समावेश झालेला आहे. सध्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. फोर्ब्सच्या यादीतून देखील ‘बाई खरंच भारी’ असल्याचं सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे यात एका मराठी महिलेचा समावेश असून ती मूळची पुण्याची आहे.
फोर्ब्समध्ये मराठी महिला
फोर्ब्सच्या २०२३ च्या यादीनुसार ३८ वर्षाच्या नेहा नारखेडे या जगातील १०० सर्वात श्रीमंत आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या महिलांमध्ये ५० व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५२० कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ४२ हजार कोटी रुपये एवढी आहे.
लिंक्डइन सॉफ्टवेअर अभियंता म्हणून त्यांनी ओपन-सोर्स मेसेजिंग सिस्टम Apache Kafka विकसित करण्यात मदत केली. Apache Kafka या सिस्टिम सॉफ्टवेयरमध्ये नेहा यांची ६ टक्के मालकी आहे.
नेहा यांनी मार्च २०२३ मध्ये क्लाउड सर्विस पुरविणारी कंपनी ‘कॉन्फ्लुएंट’ची घोषणा केली. या कंपनीमध्ये नेहा सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. ‘कॉन्फ्लुएंट’ या कंपनीची एकूण किंमत ९.१ बिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७५ हजार कोटी रुपये आहे.
मूळची भारतीय असणाऱ्या नेहा अमेरिकन टेक आंत्रप्रेन्योर असून अमेरिकेमधील सगळ्यात यशस्वी महिलांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
२०२० मध्ये देखील फोर्ब्सने नेहा यांना अमेरिकेच्या सगळ्यात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत स्थान दिलं होतं.
पुण्यात जन्म आणि शिक्षण
नेहा त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात पुण्यात राहत होत्या. त्यांचा जन्म, बालपण, सुरवातीचं शिक्षण सगळं पुण्यातच झालेलं आहे. २००२ ते २००६ या कालावधीत त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून नेहा यांनी BE, कॉम्पुटर सायन्स ही पदवी मिळवली आहे. तर पुढ याच विषयात MS करून २००६ ते २००७ मध्ये त्यांनी मास्टर्सच शिक्षण अमेरिकेत घेतलं.
नेहा नारखेडे यांचं करियर
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा यांनी दोन वर्ष ऑरेकलमध्ये टेक्निकल स्टाफ म्हणून काम केलं. त्यानंतर लिंक्डइनमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून त्यांनी काम केलं. जॉइनिंगच्या एका वर्ष नंतरच त्यांना प्रमोट करून सीनियर सॉफ्टवेयर इंजीनियर बनविण्यात आले. त्यानंतर पुन्हा एका वर्षाने त्यांना प्रिंसिपल सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून प्रमोट करण्यात आले.
नंतरच्या एका वर्षात लिंक्डइनमध्ये त्या ‘स्ट्रीम इंफ्रास्ट्रक्चर’ च्या लीड बनल्या. लिंक्डइनमध्ये असतानाच नेहा आणि त्यांच्या कंपनीने एक ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टम काफ्का अँप डेवलप केलं.
नोकरी सोडून स्वतःची कंपनी बनवली
२०१४ मध्ये नेहा आणि त्यांच्यासोबत लिंक्डइनच्या दोन सहकाऱ्यांनी नोकरी सोडली आणि ‘कॉन्फ्लुएंट’ सूरू केलं. कॉन्फ्लुएंट एक क्लाउड सॉल्यूशन देणारी कंपनी आहे जी वेगवेगळ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस करण्यात मदत करते.
नेहा ५ वर्षपर्यंत या कंपनीच्या चीफ टेक्नोलॉजी आणि प्रोडक्ट ऑफिसर राहिल्या. सध्या त्या कंपनीच्या बोर्ड मेंबर आहेत. नेहा यांनी २०२१ मध्ये ‘ऑसिलर’ या नावाने कंपनी सुरू केली. या कंपनीच्या देखील नेहा CEO आहेत.
फोर्ब्सच्या यादीतील इतर ३ भारतीय महिला
नेहा नारखेडे यांच्यासोबतच जयश्री उल्लाल, नीरजा सेठी आणि इंद्रा नूयी या एकूण ४ भारतीय मूळ असलेल्या महिलांचा फोर्ब्स २०२३ च्या जगातील १०० सर्वात श्रीमंत आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या महिलांमध्ये समावेश आहे.
इंद्रा नुयी
67 वर्षीय इंद्रा नूयी फोर्ब्सच्या यादीत 77 व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती ३५० कोटी डॉलर्स आहे. त्यांनी पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ या पदावर काम करत कंपनींच्या विकासात २४ वर्षाचं मोठं योगदान दिलं.
२०१९ मध्ये त्या पेप्सिकोमधून निवृत्त होऊन Amazon च्या बोर्डात सामील झाल्या. त्यांनी येलमधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
नीरजा सेठी
६८ वर्षीय नीरजा सेठी या यादीत २५ व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ९९० कोटी डॉलर्स आहे. त्यांनी त्यांचे पती भरत देसाई यांच्यासोबत १९८० मध्ये स्थापन केलेली ‘सिंटेल’ ही कंपनी ‘फ्रेंच IT फर्म Atos SE’ ला ऑक्टोबर २०१८ मध्ये ३.४ अब्ज डॉलर्समध्ये विकली. यातून नीरजा यांना त्यांच्या स्टेकसाठी अंदाजे ५१० कोटी डॉलर्स मिळाले.
नीरजा यांनी त्यांचं बॅचलर आणि मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीतून घेतलं आहे. ओकलंड विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ सायन्स केलं आहे.
जयश्री उल्लाल
या यादीत १५ व्या क्रमांकावर ६२ वर्षीय जयश्री उल्लाल असून त्या भारतीय वंशाच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची संपत्ती २.४ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
२००८ पासून त्या अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा आणि सीईओ असून त्यांच्याकडे या कंपनीचे सुमारे २.४ टक्के स्टेक आहे. या कंपनीने वर्ष २०२२ मध्ये जवळपास ४.४ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती.
जयश्री यांनी सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचं आणि सांता क्लारा विद्यापीठात अभियांत्रिकी व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं आहे.