पुणे : जिल्ह्यात रविवारी आळंदी येथे वारकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंदिरात प्रवेश करण्यासाठी वारकऱ्यांनी आग्रह धरला आणि पोलीस प्रशासनाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने भाविक संतप्त झाले होते. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, तर प्रशासनाकडून मात्र लाठीचार्ज केला नसून केवळ वाद झाल्याचे सांगण्यात आले.
आळंदी येथे मंदिर व्यवस्थापनाने 45 दिंड्यांमधून (गट) केवळ 75 भाविकांना प्रवेश देण्याचा निर्णय यंदा घेतला होता. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे यंदा केवळ 75 वारकऱ्यांना आत जाऊ देण्यात आले होते. यानंतर मंदिराच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती. या वारकऱ्यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सगळी घटना घडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेबाबत म्हणाले की, “आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही. त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करु नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.”
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.”
खासदार सुप्रिया सुळेंच ट्विट
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाविकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध केला आहे. सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या की, वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो.! जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.